Friday, October 1, 2010

गोरखगड २६-०९-२०१०

शेवटी हां हां म्हणता आमचा गोरखगड चा ट्रेक नक्की झाला. तारीख ठरली
२६-०९-२०१०. आम्ही पाच जण, मी, सचिन, विनायक, समीर आणि हर्षल. पहाटे सहा वाजता
कल्याण एस. टी. स्टॅंडवर भेटायचं ठरलं. समीर आणि हर्षल पुण्यावरून येणार होते.
मी, सचिन आणि विनायक मुंबईवरून. पण आदल्या दिवशी रात्री सचिनचा फोन आला की तो
येऊ शकणार नाही. मग काय, आम्ही चौघंच.........पण या वेळेला जायचंच असं नक्की
केलं होतं. पहाटे सहा वाजता कल्याण ला भेटायचं ठरलं होतं खरं पण सहा वाजता मी
मुलुंडला ट्रेन पकडली. वाटेतून विनायकला फोन केला. तो कोपरला माझ्याच डब्यात
चढला. कल्याणला पोचायला साडेसहा वाजले. समीर आणि हर्षल रात्री तीन वाजताच
कल्याणला पोचले होते. इतका वेळ कसा काढला हे त्यांचं त्यांनाच माहित.
कल्याणला मुरबाड ची यष्टी पकडली. आम्ही चौघं जुने मित्र, पण जवळपास एका
वर्षाने असे भेटत होतो. तेव्हा त्या एका तासात पूर्ण वर्षभराचं बोलून घेतलं.
मुरबाडला पोचल्यावर स्टॅंडवरच च्याव म्याव केलं. पोहे आणि साबुदाणा खिचड़ी.
थोडं पार्सल पण घेउन ठेवलं. मग तिकडून टमटम पकडून म्हसा. परत एक गाड़ी बदलून
देहरी. या दोन्ही गाडयांमधे बसून आमचं अगदी सॅन्डविच झालं. एका गाडीत कमीतकमी
पंधरा माणसं भरली होती. देहरीला पोचेपर्यंत साडेनऊ वाजले होते. तसा आम्हाला
उशीरच झाला होता. समोर गोरख आणि मच्छिंद्र आपली डोकी काढून उभे होते.
गोरखची उंची समुद्रसपाटीपासून २१३७ फूट. पैकी आम्हाला साधारण १८०० ते १९०० फूट चढायचं असावं. उन बऱ्यापैकी वर चढलं होतं. पण गोरखवर थोड़े ढग रेंगाळत होते.
आपण जिकडे उतरतो तिकडून थोडं मागे चालत जायचं. मग डाव्या हाताला वळून
थोडं चालल्यावर विठ्ठल मंदिर लागतं. त्या मंदिराच्या मागून गडावर जाणारी वाट
आहे. बरेच जण मंदिराच्या डावीकडली वाट पकडतात आणि जंगलात फिरत बसतात. आमच्या
आधी एक ग्रुप त्या वाटेने गेला होता बहुतेक, कारण आम्ही मंदिरात पोचलो तेव्हा
ते तिकडे परत आले होते आणि आम्हाला वाट विचारायला लागले. आम्हीपण पहिल्यांदाच
आलेलो, आम्ही काय वाट सांगणार ड़ोम्बल.... पण तेवढ्यात एक आजीबाई तिकडे
दिसल्या. त्यांना वाट विचारली. तेव्हा त्यांनी आम्हाला मंदिराच्या मागुन जाणारी
वाट दाखवली. मनात म्हटलं बरं झालं आपल्याला उशीर झाला ते, नाहीतर आम्हाला पण
त्या ग्रुप सारखं रान भटकावं लागलं असतं.

समोर एक छोटी टेकडी, ती चढून परत पलिकडे थोड़ी उतरून गेल्यावर अजुन
एक थोडा उंच डोंगर. तो डोंगरही थोडा उतरून गेल्यावर आपण गोरखगडाच्या मुख्य
सुळक्यापाशी येतो. पहिली टेकडी तशी फार उंच नाही. ती पूर्ण चढ़ेपर्यंत मात्र
गोरख आणि मच्छिंद्र अजिबात दिसत नाहीत. वर पोचल्यावर परत दोघांनी आपलं दर्शन
दिलं. आता ढग थोड़े हटले होते आणि आमच्यासमोर मच्छिंद्र, गोरख आणि त्यांच्याही
मागे व उंचच उंच असा अहुपे घाट दिसू लागला. त्याच्या उजव्या बाजूला थोडं
लांबवर सिद्धगड़ ढगात डोकं बुडवून उभा होता. डावीकडे मच्छिन्द्रगड़ मग गोरख,
त्यामागे अहुपे घाट आणि शेवटी सिद्धगड़ असा मोठा पट आमच्यासमोर उलगडला होता.
आम्ही मिनिटभर ते सौंदर्य पिऊन घेतलं. परत चालायला सुरूवात. थोडं उतरल्यावर
पुन्हा चढ़. आता जंगल थोडं दाट होऊ लागलं होतं. ही वाट एकदम चढ़ावाची होती.
पावसात पाणी याच वाटेने उतरल्यामुळे ती निसरडीही झाली होती. चढताना धाप लागत
होती. काही ठिकाणी तर एवढी निसरडी वाट की आम्हाला रांगत रांगत पार करावी लागली.
काही ठिकाणी झाडांची मुळं बाहेर आली होती. ती पकडून चढायला मदत झाली. या वाटेवर आमचे बरेच ब्रेक झाले.

ही निसरडी आणि खड्या चढाची वाट संपल्यावर डोंगराच्या
माथ्यावर आलो आणि बघतो तर वाटेवर सहा सहा फूट उंचीची झुडपं आमची वाटच बघत
होती. त्या झुडपांमधून पायाखालची वाट जेमतेम दिसत होती. आता मी पुढे झालो. तसेच
अंदाजाने वाट काढत होतो. झाड़ी अक्षरशः हटाने बाजूला करावी लागत होती तेव्हा
कुठे जेमतेम पुढे जायला मिळायचं. त्यातून आणखी एक भीती....खालून कोणी जनावर आलं
तरी कळणार नाही. झपझप पावलं टाकित तो भाग पार केला.
आता परत थोड़ी उतरण, परत थोडा चढ़. आता आपण सुळक्याच्या खालून उजव्या बाजूने चालत असतो. वर अवाढव्य गोरखगडाचा सुळका आपल्याला दिसत राहतो. किती छान पायवाट. दोन्ही बाजुना लुसलुशीत गवत. त्यांमागे झाडं. आम्ही एका मोकळ्या पट्ट्यावर पोहोचलो. आमच्या डाव्या बाजूला होता गोरखगडाचा सुळका, उजव्या बाजूला खोल दरी, आणि त्या पलिकडे नयनरम्य अहुपे घाट. त्या पलिकडे सिद्धगड़.
या ठिकाणी आम्हाला अहुपे घाटाचं अप्रतिम दर्शन घडलं. घाटमाथ्यावर ढग रेंगाळले होते. तेवढ्यात ढग थोड़े हटले आणि त्या झरोक्यातून सुर्याच्या किरणांनी प्रवेश केला. आणि त्या पर्वतावरून खाली उतरणारा छोटासा झरा प्रकाशमान झाला. जणू काही तो पूर्ण पर्वत एक रंगमंच आहे आणि तो झरा म्हणजे कोणी नट आहे व वरून त्यावर कोणीतरी स्पॉटलाइट टाकला आहे. आम्ही बराच वेळ ते निसर्गाचं कौतुक बघत उभे होतो. पुन्हा थोड़े ढग, पुन्हा ऊन. असा खेळ कुठे पैसे देऊन पण बघायला मिळत नाही.
ती ऊनपावसाची कथा संपली आणि पुन्हा अहुपे घाटावर ढगांचं साम्राज्य पसरलं. परत चालायला सुरुवात केली. जवळचं पाणी संपत आलं होतं. एक झरा लागला. त्याच्या वाटेमधे कोणीतरी केळीचं पान ठेवलं होतं. त्याच्या खोलगट देठावरून पाणी खाली वाहत होतं. त्याखाली बाटली धरली आणि पाणी भरून घेतलं.
मधुर पाणी. आता वाट कड्याबरोबर डावीकडे वळली. झाडांची दाटी वाढली. थोडं अंतर चालून गेल्यावर समोर महादेवाचं मंदिर दिसू लागलं. कमरेपर्यंत मोडक्या तोडक्या भिंती, त्यावर बाम्बूचा टेकू देऊन टाकलेलं छप्पर. पण आतमधे मंदिरासारखी काही निशाणी दिसत नव्हती. त्यापुढे मात्र शेंदरी रंगाचा चौथरा, त्यावर उजव्या बाजुला पादुका. त्यांवर पिवळं फूल वाहीलेलं. अगदी चांदोबा मासिकातल्या चित्रांची आठवण झाली. चौथर्‍याच्या डाव्या बाजूला चौकोनी आकाराच्या दगडात कोरलेलं शिवलिंग. समोर नंदी नव्हताच. शिवलिंग आणि त्याच्या बाजूला पादुका असं दृश्य पहिल्यांदाच बघत होतो.
त्या जागेच्या पलीकडून एक वाट उजवीकडे दरीत खाली उतरत होती. वाट बहुदा वापरातली असावी. इकडे एका मर्कटराजांचं आम्हाला दर्शन घडलं. ते माकड बिनधास्त आमच्यापासून पाच दहा फूटांवरून वावरत होतं. त्याचं आमच्याकडे फारसं लक्ष नव्हतं. ते झाडीत काही किडुक मिडुक खायला मिळतं का ते बघत होतं. त्याचे थोड़े फोटो काढले आणि पुढे सरलो.


आता मुख्य कड्याची चढ़ण सुरु होते. खडकात कोरलेल्या उंच पायर्‍या. सरळ चढ़ावाच्या. बाजुच्या कड्याला धरून चढत होतो. वर शेंदरी रंगाचं चौकोनी दार दिसत होतं. दाराच्या अगोदरच्या पायर्‍या तर अगदी सरळ चढाच्या आहेत. वरच्या पायरीवर हात ठेवून चढ़ावं लागतं.

गडाच्या दारात प्रवेश करते झालो. बॅग्स दरवाज्यात ठेवून तिकडेच बसकण मारली आणि समोरचा अप्रतिम परिसर न्याहाळत बसलो. पुन्हा तोच परिसर....समोर अहुपे घाट आणि त्यामागे थोडासा दिसणारा सिद्धगड़. पण निसर्गाची गम्मत अशी की तो कधीच एकसारखा रहात नाही. परत परत बदलत असतो. आम्ही परत तेच दृश्य बघत होतो पण काहीतरी नवीन बघितल्यासारखं.
आता डाव्या बाजुच्या काही डोंगररांगाही दिसत होत्या. या दरवाज्यातून आत शिरल्यावर भुयारातुन थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर आपण दुसरया बाजूला बाहेर पडतो. बाहेर ऊन पडलं असुनही या
भुयारात मस्त थंड वाटत होतं. दुसरया बाजूने बाहेर पडल्यावर परत पायर्‍या सुरु.
एका पायरीवर काहीतरी कोरलं होतं. भाषा कळली नाही.
शेवटचा चढ़ चढून आम्ही कड्याच्या मागच्या बाजूला गोरखनाथांच्या गुहेपाशी येउन पोचलो. गुहा खडकात कोरलेली. तिच्यासमोर मोकळी जागा. गुहेच्या भिन्तिपाशी काही टाकी खोदलेली. त्या
मोकळ्या जागेत अजुनही काही चौकोनी खड्डे होते. त्यांमधे पावसाचं पाणी साचलं
होतं. त्या समोर खाली काही अंतरावर अजुन काही टाकी आणि त्याखाली दरी. पोचल्या
पोचल्या तिकडेच ब्याग्स टाकल्या आणि बसकण मारली. खुप दमलो होतो हे तर खरंच पण
समोरचं दृश्य पाहून सगळा शीण निघून गेला. समोरच मच्छिंद्रचा सुळका शांतपणे उभा होता.
त्याची एक सोंड गोरखच्या खाली जंगलात उतरली आहे. त्यामुळे हे गुरु शिष्य
मांडीला मांडी लावून बसल्यासारखे वाटतात. खाली भेटलेला ग्रुप आमच्या आधीच वर
येउन पोचला होता. त्यांच्यापैकी काहीजण गुहेजवळ बसले होते. काहीजण गड भटकायला
गेले होते. गडाचा घेरा तसा फारच छोटा. खरं तर हा गड नाहीच. असं म्हणतात की
गोरखनाथांच्या तपश्चर्येचं ठिकाण म्हणून याचं नाव गोरखगड. त्यामुळे तटबंदी
नाही. सुळक्याच्या सर्व बाजूंना गुहा खोदलेल्या आहेत. गुहेच्या बाजूला
पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे. पण पाणी थोडं खराब दिसत होतं. त्यावर धुळीचा थर
जमला होता. त्यातलं पाणी काढून हात पाय धुतले. थोडा वेळ बसलो.
शेवटच्या सुळक्यावर चढ़ाई करण्यासाठी कड्याच्या बाजूने अजुन
डावीकडे जावं लागतं. समीर दोन दिवसांच्या जागरणाने दमला होता. म्हणाला, "मी
ब्यागांजवळ बसतो, तुम्ही जाऊन या." तिकडे माकडं पण खुप होती. कोणी बसलं नसतं तर
सामानाची खैर नव्हती।
मग मी, हर्षल आणि विनायक असे तिघंच पुढे निघालो. वाट कड्याच्या उजव्या बाजूने सरळ सरळ पुढे जाते. मग डाव्या बाजूला वळल्यावर आपण वर जायच्या वाटेच्या खाली उभे असतो. ही वाट पूर्ण दगडात कोरलेली आहे. सुरुवातीचा पंधरा वीस फूटाचा कातळ चढून जावं लागतं. मग खडकात कोरलेल्या पायरया आहेत. प्रथम हर्षल पुढे झाला. तो कातळ चढून गेला आणि त्या पाठोपाठ मी आणि विनायक.
इथून पुढे पायरया फार अरुंद आणि खड्या चढ़ावाच्या आहेत. एका वेळेला एकच माणूस चढू शकेल. उजव्या बाजूला कडा आणि डाव्या बाजूला......काही नाही. पडलो तर कपाळमोक्षच. एक बरं आहे की या पायरयांना आधारासाठी खोबण्या केलेल्या आहेत.

बऱ्यापैकी अंतर चढून गेल्यावर एक छोटीशी मोकळी जागा लागते. तिथेच एक कोरडी गुहा आहे. बहुदा टाकं असावं. इथून पायरया उजवीकडे वळतात. आता मी पुढे झालो. परत थोडं चढून गेल्यावर
पायरया परत डावीकडे वळतात. या वळणावर फार जपून चढ़ावं लागतं. या पायरयापण पार
केल्यावर आपण माथ्यापासून थोडेच खाली राहतो. आता गवतातून चढ़णारी मातीची वाट
आहे. थोड्याच वेळात आम्ही माथ्यावर पोचलो. माथा फारच छोटा आहे. पावसाळा
नुकताच संपत आल्यामुळे माथ्यावर गवत माजलं होतं. एक महादेवाचं मंदिर. लाल रंगात
रंगवलेलं. समोर नंदी. परत पुढे थोडीशी जागा.

इथे कड्याच्या टोकाशी खुर्च्यांसारखे दगड आहेत. त्या दगडांवर बसलो आणि ट्रेक सार्थकी लागला. पाय दरीत सोडून बसलो होतो. वर आकाश, खाली दरी. "Living on the edge."
समोर पश्चिमेकडे मोठा परिसर दृष्टीस पडत होता. डावीकडे अहुपे घाट आणि सिद्धगड़.
वारा अजिबात पडला होता. आम्ही बराच वेळ तिकडे काढला. तो सर्व परिसर आम्ही कितीतरी वेळ डोळ्यांनी पीत होतो. अचानक लक्षात आलं की समीर खाली एकटाच आहे तो कंटाळला असेल. मनाविरुद्ध उठावं लागलं. महादेवाला नमस्कार करून उतरायला सुरुवात केली. हा उतार सरळ उभं राहून उतरताच येत नाही. पाठमोरं राहुनच उतरावं लागतं. तो पूर्ण सुळका उतरून आलो तर खाली मगाचचा ग्रुप
येउन वर चढत होता.
गुहेजवळ आलो तर समीर आणि त्या ग्रुप मधला आणखी एक मुलगा बसले होते. आम्ही वर गेल्यावर त्या मुलांना माकडांनी खुप त्रास दिला होता म्हणे. म्हणून आम्ही गुहेत
जेवायला बसलो. गुहा चांगली प्रशस्त आहे. गुहेला दोन खांब आहेत. तेहि दगडातच
कोरलेले. उजव्या बाजुस जमिनीवर एक मुखवटा कोरला आहे. त्यावर शेंदुर फासलं आहे.
अडीचच्या आसपास जेवण आटोपलं. संध्याकाळी देहरी गावातून मुरबाडसाठी साडेपाचची एस
टी आहे. ती पकडायची म्हणून तीनच्या आसपास उतरायला सुरुवात केली. खालच्या
महादेवाच्या मंदिरापर्यन्तचा उतार उतरायला वेळ लागतो. नंतर मात्र आपण पटापट
उतरतो. उतरायला सुरुवात केली तेव्हा पर्जन्य महाराजांनी हजेरी लावली होती. पण
फारच थोडा पाऊस पडला. त्यामुळे जमीन निसरडी झाली. मग काय, उतरताना
बऱ्याचश्या ठिकाणी घसरगुंडी करत करतच उतरलो. वाटेच्या दोन्ही बाजूचं गवत ओलं
झालं होतं. चालताना ते नाजुक ओले हात आमच्या पायांना लागत होते. तो लुसलुशित
स्पर्श अनुभवत वाट कापीत होतो. आमच्या अंदाजापेक्षा खुप आधी म्हणजे जवळपास
चारच्या सुमारास आम्ही विठ्ठल मंदिराजवळ पोचलो देखील. वाटलं, वरती अजुन वेळ
काढला असता तरी चाललं असतं. पण आता वेळ निघून गेली होती. विठ्ठल मंदिराजवळच
फ्रेश झालो.
खाली उतरल्यावर आमच्या मागचा ग्रुप आमच्या मागोमागच येउन पोचला.
त्यांच्याकडून आम्ही उतरल्यानंतरची घटना आम्हाला ऐकायला मिळाली. आम्ही उतरायला
घेतल्यावर त्या ग्रुप मधला एकच मुलगा उरला होता. त्याच्याजवळ खिरीचा डबा होता. आम्ही गेल्यावर तिकडे माकडांची एक टोळी आली. त्यांनी तो डबा त्या मुलाकडून हिसकावून घेतला. घेतला म्हणजे काय, एवढ्या माकडांना बघून तोच बाजूला झाला आणि तो डबा आपसुकच त्या माकडांच्या हाती लागला. त्या माकडांनी खीर फस्त केली आणि डबा दरीत फेकून दिला. कोणताही पुरावा त्यांनी मागे ठेवला नाही.
देहरी नाक्यावर येऊन उभे राहिलो. तिकडे परत ब्यागांमधून उरलेलं च्याव म्याव बाहेर पडलं. शेजारी टपरीवर चहा झाला. तोपर्यन्त यष्टीही आली. एक बरं होतं की आता
आम्हाला मुरबाडपर्यन्त गाड़ी बदलण्याची गरज नव्हती. बस मधे बसलो. डाव्या बाजूला
गोरख आणि मच्छिंद्र सकाळसारखेच उभे होते. स्थितप्रज्ञ......... आजवर किती
गिर्यारोहक त्यांच्या अंगाखांद्यावर चढले असतील. किती ऋषिमुनिंनी त्यांवर
आपल्या तपश्चर्या पूर्ण केल्या असतील. स्वतः गोरखनाथांनी त्यावर तपश्चर्या केली
होती म्हणे. काय काय बघितलं असेल या पर्वतांनी? महाराष्ट्रावर आलेला सुल्तानी
वरवंटा बघितला असेल? शिवप्रभूंचं रामराज्य बघून हे आनंदले असतील?
नक्कीच......नक्कीच आनंदाने गहिवरून आली असतील त्यांची मनं. असे काय काय विचार मनात येउन गेले.
गाड़ी हलली. गोरख आणि मच्छिंद्र हळू हळू पुसट होत गेले. सिद्धगड़ही
मागे पडला. मागे समीर आणि हर्षल कधीच गाढ झोपले होते. मी कॅमेरा काढला. विनायक
आणि मी दिवसभरातले फोटो बघायला लागलो. आणि गोरखगड परत डोळ्यांतुन मनात उतरायला लागला.

No comments: